शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात नवीन बियरबार व वाइन शॉप सुरू करण्यास नाहरकत दाखले दिल्याच्या चर्चेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या आंदोलनाला मोठे वळण मिळाले असून नगरपंचायत प्रशासनाने अशा कोणत्याही परवानग्या दिलेल्या नाहीत व भविष्यातही देणार नसल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उद्या होणारा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत नवीन वाइन शॉप आणि बियरबारसाठी नाहरकत दाखले देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये रंगली होती. या चर्चेची माहिती शहरभर पसरताच नागरिकांमध्ये, विशेषतः महिलावर्गात तीव्र संतापाची लाट उसळली होती. शहरातील सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त करत स्वशक्ती व्यसनमुक्ती समितीच्या वतीने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल आणि गटनेते अतुल बारी यांनी मोर्चा आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, मुख्याधिकारी विवेक धांडे हे कार्यालयीन कामानिमित्त मुंबई येथे असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून समिती सदस्यांशी संवाद साधला. या चर्चेनंतर नगरपंचायतीकडून कोणत्याही नवीन बियरबार किंवा वाइन शॉपसाठी नाहरकत दाखले देण्यात आलेले नाहीत तसेच भविष्यातही देण्यात येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.
या संदर्भात मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या वतीने कार्यालय अधीक्षक सोनजे यांच्या स्वाक्षरीने सुनील गुजर यांना लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाच्या या लेखी भूमिकेनंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उद्या आयोजित मद्य विक्री नाहरकत दाखल्यांविरोधातील मोर्चा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.
नगरपंचायत प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वशक्ती व्यसनमुक्ती समिती तसेच शहर जागरूक नागरिक मंच, शेंदुर्णी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, शहराच्या सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.