मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या तालुक्यातील बाराशे लाभार्थी मंजुरी अभावी त्यांची प्रकरणे प्रलंबित पडून होती. मात्र हे प्रकरण अखेर रोहीणीताई खडसें यांच्या प्रयत्नांने मंजूरी मिळाली आहे.
महाराष्ट्र शासना तर्फे समाजातील विधवा, परितक्ता, दिव्यांग, वयोवृध्द, निराधार या वंचित घटकांना चरितार्थ चालवण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ राज्य सेवा योजना या विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा मानधन दिले जाते. त्यासाठी लाभार्थ्यांना योग्य त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो. तालुका स्तरीय संजय गांधी निराधार योजना समिती यातील पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देते. मग त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मानधन मिळणे सुरू होते.
परंतु मुक्ताईनगर तहसील अंतर्गत सन: २०२३ मधील या योजनांचे पात्र प्रकरणे मंजुर करून निकाली काढण्यात आले होते. परंतु सन:२०२२ ते २०२३ या वर्षात लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाकडे सादर केलेले १२०० प्रकरण तहसील कार्यालयाकडे मंजुरी अभावी प्रलंबित पडून होते. लाभार्थ्यांना आपले प्रकरण नामंजूर किवा त्रुटी निघाली याबाबत कोणतीच माहिती दिली जात नव्हती. सदर लाभार्थ्यांचे प्रकरण निकाली न काढल्यामुळे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते.
सदर गंभीर स्वरूपाची बाब लाभार्थ्यांनी रोहिणीताई खडसे यांच्या निदर्शनास आणुन दिली. त्यानंतर रोहिणी ताई खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ६ जुन रोजी मुक्ताईनगर तहसीलदार यांना हे सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याविषयी निवेदनाद्वारे विनंती केली. आणि प्रकरण निकाली न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी सुद्धा तहसिल कार्यालयात भुसावळ प्रांताधिकारी, मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत या योजनांचे प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्या बाबत तालुका प्रशासनाला निर्देश दिले होते.
त्यानुसार प्रलंबित १२०० पैकी ८९९ प्रकरणांना मंजुरी मिळाली असून त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरम्यान प्रकरण मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी बँकेच्या पासबुक, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत, दोन पासपोर्ट फोटो मोबाईल नंबर सह तहसिल कार्यालयात जमा करावे. व काही अडचण आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय किंवा पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यु.डी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माळी यांनी केले आहे. दरम्यान प्रलंबित प्रकरणाना मंजुरी मिळाल्या बद्दल लाभार्थ्यांनी आ. एकनाथराव खडसे, रोहिणी ताई खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.