मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून संजय राऊत यांनी आता पन्नास खोक्यांवाले कोणत्या डोंगर झाडीत लपून बसलेत ? असा सवाल विचारला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल मुंबईच्या आर्थिक भरभराटीत राजस्थानी आणि गुजराती समाजाचे योगदान असल्याचे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे.
पत्रकारांशी बोलतांना राऊत आज म्हणाले की, महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे. मुंबई मराठी माणसांची आणि कष्टकर्यांची आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. मराठी, कष्टकरी जनतेवरील अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. राज्यपालांना मी नाना शंकरशेठ यांचं चरित्र पाठवणार असून त्यांनी ते वाचावं, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, त्याचवेळी त्यांनी शिंदे गटानं राज्यपालांचा साधा निषेध तरी करावं, असं आव्हान केलंय. पन्नास खोक्यांवाले कोणत्या डोंगर झाडीत लपून बसलेत असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.