जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जगभरातील फुटबॉलप्रेमी ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या 23व्या फिफा पुरुष विश्वचषकाला 12 जूनपासून सुरुवात होत आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली 20 जुलैपर्यंत चालणारी ही स्पर्धा अनेक ऐतिहासिक विक्रमांची साक्षीदार ठरणार आहे. 96 वर्षांच्या विश्वचषक इतिहासात प्रथमच तीन देश एकत्रितपणे या स्पर्धेचे आयोजन करत आहेत. स्पर्धेचा उद्घाटन सामना 12 जून रोजी मेक्सिको सिटी येथे यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. यंदा प्रथमच 48 संघ सहभागी होत असून 16 शहरांमध्ये एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. यापूर्वी विश्वचषकात 32 संघ आणि 64 सामने असत. त्यामुळे हा फिफाच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक ठरणार आहे.
नवीन फॉरमॅटनुसार 48 संघांना 12 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात चार संघ असतील. गटातील अव्वल दोन संघांसह तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघांना नॉकआउट फेरीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे यंदा 16 ऐवजी 32 संघ नॉकआउट टप्प्यात पोहोचतील. डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाचा समावेश गट जेमध्ये करण्यात आला आहे. स्पेन, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल आणि इंग्लंड यांसारख्या बलाढ्य संघांचे गट अत्यंत आव्हानात्मक मानले जात आहेत. विशेषतः स्पेन आणि फ्रान्सच्या गटांना ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणून ओळखले जात आहे, कारण त्यांच्यासमोर उरुग्वे, सेनेगल आणि नॉर्वेसारखे मजबूत प्रतिस्पर्धी आहेत.

यंदाच्या स्पर्धेत फुटबॉलचे दोन महानायक, Lionel Messi आणि Cristiano Ronaldo यांच्यासह तब्बल 1,248 खेळाडू मैदानात उतरणार आहेत. स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू स्कॉटलंडचे गोलरक्षक Craig Gordon असून त्यांचे वय 43 वर्षे आहे, तर सर्वात तरुण खेळाडू मेक्सिकोचा Gilberto Mora असून तो अवघ्या 17 वर्षांचा आहे. काबो वर्डी, क्युरासाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तान हे चार देश पहिल्यांदाच विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. तसेच ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि स्कॉटलंड हे संघ दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत आहेत.
बक्षीस रकमेच्याही बाबतीत हा विश्वचषक विक्रमी ठरणार आहे. सहभागी संघांमध्ये 655 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम वाटली जाणार असून विजेत्या संघाला सुमारे 429 कोटी रुपये मिळतील. उपविजेत्याला 283 कोटी रुपये, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे 249 आणि 232 कोटी रुपये मिळणार आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात Brazil हा सर्वाधिक यशस्वी संघ ठरला असून त्यांनी विक्रमी पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. जर्मनी आणि इटलीने प्रत्येकी चार वेळा, तर अर्जेंटिनाने तीन वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
1930 मध्ये उरुग्वेमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेने आता जागतिक क्रीडा विश्वातील सर्वात प्रतिष्ठेचा मुकुट मिळवला आहे. 2022 मध्ये कतार येथे झालेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून तिसरे विश्वविजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदा अर्जेंटिना सलग दुसरे विजेतेपद जिंकते का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतातील फुटबॉल चाहत्यांना विश्वचषकाचे सामने युनाईट8 स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार असून झी5 ॲप आणि संकेतस्थळावर त्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत विविध वेळांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.



