मुंबई, वृत्तसंस्था | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून, ठाकरे यांच्यासह सात जणांना तब्बल ५६ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, हे तात्पुरते खातेवाटप असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खातेवाटप जाहीर झाले असले तरी, भाजपच्या भीतीने ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्याचे खातेवाटप हे तात्पुरते असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर यथोचित खातेवाटप होणार आहे. एका मंत्र्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर का पडला आहे, यामागील कारण सांगितले आहे. ‘भाजपने कर्नाटकात जो प्रयोग केला, तसे राज्यात घडू नये, या भीतीने योग्य खबरदारी घेतली जात आहे. अधिवेशन काळात काही आमदारांनी पाठिंबा काढून घेतला तर सरकार कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही धोका पत्करायचा नाही,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच
उपमुख्यमंत्रिपद नेमके कुणाला देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. ‘उपमुख्यमंत्रिपद कुणाला द्यायचे, हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हे ठरवतील. विधानसभा अध्यक्षपद जर काँग्रेसला दिले गेले तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला दिले जाईल. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपद अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यापैकी कुणाला द्यायचे हा निर्णय घेतला जाईल, असेही या मंत्र्याने सांगितले.