वाढती फास्टफूड संस्कृती आरोग्यास घातक : डॉ. महेश पाटील

b85e3454 901a 43c1 a5be 73557ec36dad

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) भारतीय जनतेमधील हाडांच्या व्याधी परदेशी नागरिकांपेक्षा अधिक असून भारतातील वाढती फास्टफूड संस्कृती आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे, मत अस्थिरोग तज्ञ डॉ.महेश पाटील यांनी व्यक्त केले. ते आई फाउंडेशन व इनरव्हिल क्लब मिल्कसिटीच्या वतीने आयोजित केलेल्या हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिराप्रसंगी बोलत होते.

 

याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ.तानसेन जगताप,आई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर,सचिव डॉ. चेतना कोतकर, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा योगिता बंग,सचिव मनिषा पाटील व्यासपिठावर उपस्थित होते. उच्च रक्तदाब,मधुमेह तपासणी दरम्यान समजू शकते परंतु हाडांच्या बाबतीत असे नसल्याचे सांगून अपघात,हाड तुटणे या घटनेनंतर हाडांच्या रोगासंदर्भात आपल्याला जाणीव होते.स्त्री व पुरुषांच्या हाडांबाबतीत स्त्रियांची हाडे लवकर ठिसूळ होतात. तारुण्यातच अधिक जागृत राहून हाडांची घनता व ठिसूळपणा तपासून घेतल्यास त्यावर योग्य औषधोपचार होवू शकतात.भारतीयांमध्ये अस्थिरोगाचे प्रमाण अधिक असून परदेशी व्यक्तींच्याबाबत ते कमी आहे.योग्य वेळी योग्य आहार घेतल्यास घनता प्रमाणात राहते.सद्या फास्टफूट,जाडी कमी करण्याचे नवनवीन उपचार पध्दतीने तरुण व तरुणींमध्ये अस्थिरोगाचे प्रमाण वाढत आहे ही चिंतेची बाब असल्याचे डॉ.महेश पाटील यांनी सांगितले.

 

महिलांच्या वाढत्या वयोमानानुसार हाडे कमकुवत होत असतात तर बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांवर परिणाम होत असल्याचे आढळून येते.हाडांची ठिसूळता ही हाडांच्या घनतेवर अवलंबून असून रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये वाढत्या वयानुसार कॅल्शियमचे प्रमाण कमी होत जाते.यामुळे भविष्यात फ्रैक्चर,संधिवात,कंबर दुखी,गुडघ्यांचे दुखणे आदी वात रोग होण्याची शक्यता अधिक असते.यामुळे पूर्वीच हाडांमधील कॅल्शियमची कमतरता (ऑस्टिओपोरोसिस) असल्याचे माहित झाल्यास हाडांच्या आजारांपासून वाचता येणे शक्य होते यासाठी तपासणी करणे अत्यावश्यक आहे.प्रकृतीस धोका निर्माण होण्यापूर्वी हाडांसदर्भात तपासणी व योग्य औषधोपचार घेण्याची सूचना डॉ.विनोद कोतकर यांनी मांडली.

 

आई फाऊंडेशनतर्फे आयोजित वेगवेगळ्या आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून जनजागृती होत असून डॉ.कोतकर दांम्पत्याचे कार्य हे समाजाला आदर्श वाटावे असे असल्याचे गौरवोद्गार प्राचार्य तानसेन जगताप यांनी काढले. यावेळी १५६ महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. प्रास्ताविक डॉ चेतना कोतकर यांनी केले . शिबीर यशस्वितेसाठी सुधीर चव्हाण,राकेश कोतकर,मिलींद ब्राम्हणकार,मनोज पगार,सारंग कोतकर,संदीप पाखले विवेक पुणेकर,सिमा सोनवणे,फातिमा शेख,रत्ना काकळीज,यांनी परिश्रम घेतले

Protected Content