मुंबई (वृत्तसंस्था) दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सर्वांगीण मदत देण्यात येईल. सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. आगामी काळात सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामांचा उहापोह राज्यपालांनी अधिवेशनाच्या अभिभाषण केला.
आज विधानभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणात त्यांनी नव्या सरकारचे आणि निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन करत नव्या सरकारचे भविष्यातील संकल्प मांडले. अवघ्या २० मिनिटाच्या या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर आमचं सरकार काम करेल, असं सांगतानाच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव देण्यात येईल. वाढती बेरोजगारी कमी करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. रोजगारनिर्मिती आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांसाठी शासन कायदा करेल, असेही राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले.