Home क्राईम शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत! फवारतांना विषबाधा झाल्याने तरूणाची मृत्यू

शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत! फवारतांना विषबाधा झाल्याने तरूणाची मृत्यू


पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिकांवर फवारणी करत असताना विषारी औषध पोटात आणि नाका-तोंडात गेल्याने तालुक्यातील भोकरबारी येथील एका तरुण शेतकऱ्याला विषबाधा झाली होती. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

समाधान रमेश पाटील (वय ३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. भोकरबारी येथे राहणारे समाधान पाटील हे २१ ऑक्टोबर रोजी निमबटाईवर घेतलेल्या शेतात पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. फवारणीच्या वेळी विषारी औषध शरीरात गेल्याने सायंकाळी घरी परतल्यावर त्यांना चक्कर येणे आणि अस्वस्थता जाणवू लागली.

नातेवाईकांनी तात्काळ त्यांना कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे चार दिवस उपचार घेतल्यानंतर प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. समाधान पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या आकस्मित मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी मृताचे मामा संजय धनसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाराळा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound