भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ना. रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांमुळे पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” अंतर्गत खरीप 2024 आणि रब्बी 2024-25 साठी विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला, परंतु बँकेद्वारे पैसे डेबिट न झाल्याने किंवा तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा पोर्टलवर रक्कम जमा न झाल्याने लाभापासून वंचित राहावे लागले, अशा शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा निर्णय शक्य झाला आहे.
कृषी विभागाने यासाठी विशेष पाऊल उचलत 3 मार्च ते 13 मार्च 2025 या कालावधीत बँकांसाठी एक विशेष विंडो खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत संबंधित बँक शाखांना चलनाद्वारे ही रक्कम अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषी विभागाकडे या समस्येची तक्रार नोंदविल्यानंतर विभागाने तातडीने हा निर्णय घेतला. यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतरही विम्याचा लाभ नाकारला गेला होता, त्यांना आता न्याय मिळणार आहे.