Home Cities जळगाव शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ उपक्रमांतर्गत नोंदणी करावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ उपक्रमांतर्गत नोंदणी करावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातील सर्व शेतकरी खातेदारांचा एकत्रित डिजिटल डेटाबेस तयार करण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ हा महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अनुदानासह सर्व शासकीय कृषी योजनांचा लाभ पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी प्रत्येक शेतकरी खातेदाराने या योजनेत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

या उपक्रमाद्वारे प्रत्येक शेतकऱ्याचा ‘डिजिटल शेतकरी आयडी’ (Digital Farmer ID) तयार केला जाणार असून, या आयडीच्या आधारे शेतकऱ्यांना कृषीविषयक विविध योजना, दुष्काळी अनुदाने, पिकविमा योजना, खत-बी-बियाण्यांची अनुदाने आणि इतर लाभ तत्काळ उपलब्ध होतील. हा आयडी शेतकऱ्यांच्या ओळखीचे डिजिटल साधन म्हणून काम करणार असून शासन आणि शेतकरी यांच्यातील दुवा अधिक पारदर्शक बनविण्याचे उद्दिष्ट आहे.

नोंदणी प्रक्रियेसाठी सेतु सुविधा केंद्रे व महा ई-सेवा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधार कार्डाची प्रत, ७/१२ उतारा, बँक पासबुकची प्रत आणि मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे सोबत ठेवावीत. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा डिजिटल शेतकरी आयडी क्रमांक प्रदान केला जाईल.

जिल्हा प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातील ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच सेतु सुविधा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधून ही नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या कोणत्याही कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणी अनिवार्य असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी वरील कागदपत्रांसह जवळच्या सेवा केंद्रात संपर्क साधून तात्काळ नोंदणी करून घ्यावी आणि या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

‘ॲग्रीस्टॅक’ हा डिजिटल भारताच्या दिशेने कृषी क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो. यामुळे शेतकऱ्यांचे शासकीय योजनांशी नाते अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करून डिजिटल कृषी व्यवस्थेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound