पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेत पाणंद रस्त्यांची कामे गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याने आमदार किशोर पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या कामांना गती मिळावी यासाठी त्यांनी बुधवारी पाचोरा येथील स्व.आर.ओ. तात्या पाटील व्यापारी भवनात तातडीची बैठक बोलावली.
आमदार किशोर पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मातोश्री पाणंद शेत रस्ते योजना मंजूर करून आणली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या योजनेकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे आजपर्यंत या कामांना सुरुवात झालेली नाही.

या बैठकीला उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शीतल सोलाट, जळगाव बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता एस. आर. वंजारी आणि पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. अतिवृष्टीमुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांनी या कामांना सुरुवात केलेली नाही.”
आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. तसेच, शेतकऱ्यांनीही स्वतःच्या आणि समाजाच्या विकासासाठी रस्त्यांच्या माध्यमातून विकास करून घेण्याचे आवाहन केले. मात्र, संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.


