एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यात मागील वर्षी तीव्र दुष्काळ पडूनही शासनाने जाहीर केलेली दुष्काळी मदत अद्याप तालुक्याला मिळाली नसल्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ निधीचे वाटप केले जात असतांना एरंडोल तालुक्यातील शेतक-यांवर शासनाकडून अन्याय केला जात असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. याबाबत जिल्हाधिका-यांनी त्वरित लक्ष घालुन तालुक्याला दुष्काळ निधी त्वरित वर्ग करून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.
मागील वर्षी शासनाने एरंडोल व धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर केला नव्हता, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर करण्याची मागणी केली होती. माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिका-यांनीही मागणी लावुन धरली होती. खा.ए.टी.पाटील यांनी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचे निवेदन दिले होते. शासनावर सर्वच राजकीय पक्षांकडून तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर करण्यात यावा, यासाठी दबाव टाकण्यात आल्यामुळे अखेर शासनाने तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर केला आहे. महसुल प्रशासनातर्फे तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचानामे करून दुष्काळ ग्रस्तांसाठी सुमारे २६ कोटी ९५ लाख रुपये निधी मिळावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत निधी प्राप्त न झाल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.