मधुकर कारखान्याच्या सभेत थकीत पेमेंटसाठी शेतकरी संतप्त

madhukar sabha

फैजपूर, प्रतिनिधी | येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत संचालक मंडळाला ऊस उत्पादकांच्या १५ कोटींच्या थकीत पेमेंटसाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. यावेळेस यावलचे कृ उ बा समीती उपसभापती राकेश फेगडे यांनी शेतकरी व संचालक मंडळासमोर सुचना मांडली की, शासन धोरणाप्रमाणे संचालकांच्या प्रापर्टीज मोर्गेज केल्यास थकहमी मिळु शकते. त्यासाठी त्यांनी ना. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचे उदाहरण दिले. यावर शेतकऱ्यांनी समर्थन दिले व सांगितले सभा तहकुब न करता पुढील कामकाज सुरळित चालु द्यावे व ही अट संचालक मंडळाने मान्य करावी , त्यानंतर संचालक मंडळाने अट मान्य केल्याने सभा सुरळीत पार पडली.

 

‘मधुकर’च्या कार्यस्थळावर रविवारी वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू होण्यापूर्वी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करत असताना शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली व उसाचे पेमेंट कधी देणार ? याचा जाब संचालक मंडळाला विचारण्यास सुरुवात केली, यावेळी चेअरमन शरद महाजन यांनी उस उत्पादकांना समजावत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र ऊस उत्पादक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी थेट व्यासपीठापर्यंत धाव घेतली. यावेळी चेअरमन शरद महाजन यांनी जोपर्यंत शासनाकडून थकहमी मिळत नाही तोपर्यंत थकित पेमेंट करणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यासाठी सर्व स्तरावरून पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगितले. भागवत पाटील यांनीही शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. शेतकरी शांत होत नसल्याचे लक्षात येताच चेअरमन महाजन यांनी सभा तहकूब करण्याचे जाहीर केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन राकेश फेगडे तसेच विजय पाटील यांनी शेतकऱ्यांना शांत करीत सभा होणे गरजेचे आहे, त्याशिवाय शासनाकडे ठराव जाऊ शकत नाही, आपली मागणी रास्त आहे, पण त्यासाठी सभा होऊ द्या, असे आवाहन केले. त्यानंतर विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार हरिभाऊ जावळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना कारखाना बंद व्हायला नको, जी परिस्थिती जिल्ह्यातील अन्य कारखान्यांची आहे, ती ‘मधुकर’ची होता कामा नये, असे सांगत कारखान्याचा संचित तोटा वाढल्याने जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी येत आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे सर्वांचे पेमेंट अदा करण्यासाठी एक तर थक हमी मिळवणे अथवा संचालक मंडळाची मालमत्ता तारण ठेवणे हे पर्याय आहे मात्र त्यासाठी उच्च न्यायालयाचेही काही निर्देश आहेत. आगामी काळात त्यावर निश्चित योग्य तो तोडगा निघेल व सर्वांचे पेमेंट दिले जाईल असे सांगत सर्वांना आश्वस्त केले.

यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मधुकर कारखान्यावर या विभागाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, ज्या वेदना शेतकऱ्यांच्या आहे त्याच आमच्या सुद्धा आहेत, थक हमी साठी प्रयत्न सुरू आहेत, त्याला लवकरच यश येईल, शासनाकडून आर. आर.सी. ची कार्यवाही झाली आहे व या कारवाईच्या विरोधात जिल्हा बँक न्यायालयात गेली आहे. या सर्व विषयांवर एकत्र बसून मार्ग काढला जाईल, तोवर संयम ठेवण्याचे आवाहन केले, यावेळी व्यासपीठावर आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, यांच्यासह जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, शेतकी संघाचे अध्यक्ष तथा संचालक नरेंद्र नारखेडे, कामगार युनियनचे अध्यक्ष किरण चौधरी, सर्व संचालक व हंगामात ऊस पुरवठा करणारे शेतकरी उपस्थित होते. यावेळी आभार व्हाईस चेअरमन भागवत पाटील यांनी मानले.

 

 

Protected Content