रावेर प्रतिनिधी । महसूलमत्री पालकमंत्री असणार्या जळगाव जिल्हातच शेतकर्यांचा करोडो रूपयाचा दुष्काळ निधी तब्बल दोन महिन्यांपासून पडून असल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
या बाबत वृत्त असे की, तालुक्यात यंदा दुष्काळ आहे. यात तब्बल ३६ हजार सहाशे शेतकरी ग्रस्त झालेले आहेत. शासनाकडून दुष्काळ निधी जाहीर करण्यात आला आहे. मात्र हा निधी अद्याप पर्यंत शेतकर्यांकडे पोहचलेलाच नाही. रावेर तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व शेतकर्यांना १३ कोटी ३२ लाख रुपये ६ मार्च, ८ मार्च आणि २६ मार्च रोजी संपूर्ण रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी धनादेश बँकेकडे दिला होता. परंतु तहसील प्रशासनाने दिलेली रक्कम बँकेने वेळेत शेतकर्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. यामुळे प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी संबंधीत बँकेला नोटीस काढून शेतकर्यांना २४ टक्के व्याजासह देण्याचे आदेश केलेले आहेत. बँकेने ३६ हजार ६०० लाभार्थ्यांपैकी ७ हजार २४२ लाभार्थ्यांना आज पर्यंत अनुदान वाटप केले आहे. तर उर्वरित ११ कोटी अनुदान हे दि. ९ रोजी पर्यंत बँकेतच पडून असून २९ हजार ३९३ शेतकर्यांना अनुदान वाटप करणे अजून बाकी आहे. आज भल्या पहाटे पासूनच शेतकर्यांना अनुदान वाटप करण्याचे काम सुरु आहे. तथापि, या कामात विलंब झाल्यामुळे शेतकरी प्रचंड संतप्त झालेले आहेत.
अनंत अडचणींमध्ये असणार्या शेतकर्यांना शासन आर्थिक मदत देऊन उभा करण्याचा प्रयत्न करीत असतांना वरीष्ठ अधिकारी जबाबदारी झटकत बँकेकडे बोट दाखवत आहेत. आता या निधि बाबत कर्तव्यात कसूर करण्यार्यांवर काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे