पुणतांबा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणतांबा येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास कृषी मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी येथील आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१७ च्या ऐतिहासिक संपानंतर पाच वर्षांनी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १ जून पासून धरणे आंदोलन सुरू झाले होते. कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज शनिवार, दि.४ जून रोजी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि दादा भुसे यांच्यात अडीच तास चर्चा झाल्यानंतर धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी दादा भुसे यांच्या शिष्टाईला यश आलं आहे. मंगळवारी मुंबईत चर्चा केल्यानंतर आता बुधवार, दि. ८ तारखेला आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.