नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंजाबमधील शेतकरी मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी दिल्ली चलो मार्चसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीच्या आसपासच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे. पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हरियाणात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स हटवले.
पंजाबमधील एका शेतकऱ्याने सांगितले की, आम्ही सुईपासून हातोड्यापर्यंत सर्व काही घेतले आहे. आमच्याकडे डिझेल आणि दगड फोडण्याचे साधनही पुरेसे आहे. आम्ही गावातून ६ महिन्यांचे रेशन घेतले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. हरियाणातील 7 आणि राजस्थानच्या 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद आहे. 15 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू आहे. हरियाणाची सिंघू-टिकरी सीमा आणि यूपीशी जोडलेली दिल्ली, गाझीपूर सीमा सील करण्यात आली आहे. दिल्लीतही कडक बंदोबस्त आहे. येथे एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. गर्दी जमवण्यास आणि ट्रॅक्टरच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सर्वनसिंग पंढेर म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर नाही. त्यांच्या मनात काहीतरी गडबड आहे. त्यांना फक्त वेळ घालवायचा असतो. सरकारच्या प्रस्तावावर आम्ही विचार करू, मात्र आंदोलनावर ठाम राहू. दुसरीकडे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, सर्व काही चर्चेने सोडवले पाहिजे. काही समस्या आहेत ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.