नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या ट्रॅक्टर मार्चला हिंसक वळण लागल्यानंतर केंद्र सरकारने दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद केली आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मार्चला काही ठिकाणी हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर चढाई केली आहे. या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झालीय. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा दलं सतर्क झालीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात या आंदोलनावर चर्चा सुरु आहे.
चिघळलेली परिस्थिती पाहता गृहमंत्रालयाकडून दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाजीपूर बॉर्डर, नांगलोई, मुकरबा चौक परिसरातील इंटरनेट सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आणि राष्ट्रपतीभवनाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सर्व महत्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.