सातगावात शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विलास ओंकार डांबरे (वय-३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून यांच्यावर बँकेचे कर्ज तसेच अवकाळी पावसाने झालेले नुकसान यामुळे त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. “काळाचा फेरा काहीना चुकविता येत नाही.” अशी घटना सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील विलास ओंकार डांबरे यांच्यावर वेळ आलेली आहे. सततच्या कर्जबाजारीपणामुळे तसेच दर वर्षी उत्पादन घटत असल्याने, विलास यांनी राहत्या घरातील मागच्या खोलीत जाऊन विष असलेल्या बाटलीतील विष प्राशन करून घेतले आणि बाटली खाली फेकताच त्यांच्या नऊ वर्षाच्या संकेत मुलाने बघितले. मुलाने आजोबाला व आई कविता यांना घटना सांगितली असता आरडाओरडा झाल्याने गल्लीतील लोक जमा झाले. विलास यास तात्काळ गाडी करून पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना विलास डांबरे यांची प्राणज्योत मालवली.

पत्नी कविता विलास डांबरे यांनी सांगितल्यानुसार पती विलास हे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उदासीन फिरतांना दिसत होते. जेवायलाही त्यांचे चित्त लागायचे नाही. आमच्याशी व्यवस्थित बोलत नव्हते. आम्ही त्यांना कर्ज भरण्यासाठी नेहमी पाठबळ देत तुम्ही चिंता करू नका. मात्र आम्ही अपयशी ठरल्याची खंत पत्नी कविता यांनी बोलून दाखवली. विलास डांबरे यांच्यावर टाटा फायनान्स तसेच सातगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज असल्याचे समजते. तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने बुधवारी दुपारपर्यंत गावात एकाचीही चूल पेटली नाही. तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यास शासनाने मदत करावी. अशी जनतेने अपेक्षा व्यक्त केली आहे. या घटनेबाबत  पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content