पाचोरा प्रतिनिधी । कोवीड रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर पती-पत्नी यांनी शेती गहाण ठेवून डॉक्टरांचे बिल अदा केले. ही माहिती नवजीवन कोवीड केअर सेंटरच्या संचालकांना मिळताच त्यांनी दाम्पत्याला संपुर्ण बिलाची रक्कम परत केली.
सद्यस्थितीत कोरोना परिस्थिती भयानक आहे. यातच सर्वत्र लॉकडॉउन असल्याकारणाने सर्वत्र आर्थिक भिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थिती कोरोना उपचार घेणारे ज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असेल त्यांना भला मोठा संकटाचा डोंगर चढावा लागत आहे. असाच एक प्रकार पाचोरा येथे घडला आहे. एरंडोल तालुक्यातील तळई येथील आनंदा सुकदेव पाटील व त्यांच्या पत्नी कोकिळाबाई आनंदा पाटील यांना कोरानाची लागण झाली होती. त्यांनी पाचोरा शहरातील नवजीवन कोविड केअर सेंटर येथे उपचार घेण्यासाठी दाखल झाले. दोन्ही पती-पत्नी यांनी कोरोनावर मात केली. परंतू कोवीड रूग्णालयाची बिलाची रक्कम देणे हे मोठे संकट मात्र मोठे होते तरीही ते हरले नाही. ज्यांनी आपला जीव वाचविला त्यांचे बिल देणे आपली जबाबदारी आहे अशी भूमीका घ्ठेवून तळई येथील शेती गहाण ठेवून १ लाख ६० हजार रूपये बिल भरून रूग्णालयातून घरी परतले. आनंदा पाटील यांची परिस्थिती हालाखीची आहे. त्यांनी शेती गहाण ठेवून बिल भरल्याची माहीत तळई येथील सरपंच यांच्याकडून कोवीड रूग्णालयातील डॉक्टरांना मिळाली. माहिती मिळताच कोवीड रूग्णालयाचे संचालक डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. जीवन पाटील, अभिलाष बोरकर, नंदु प्रजापत या सर्वांनी तळई ता. एरंडोल येथे त्यांच्या घरी जावून संपूर्ण बिलाची रक्कम परत केली. याबाबत संपूर्ण परिसरात नवजीवन कोविड केअर सेंटरच्या संचालक डॉक्टर व मेडिकल चालक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.