खामगाव प्रतिनिधी । दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नितीन राठोड आणि संजयसिंग राजपूत या दोन हुतात्म्यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी अलोट जनसमुदाय लोटला होता.
काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील नितीन राठोड आणि संजयसिंह राजपूत या दोन सुपुत्रांनाही वीरमरण आले. त्यांच्यावर आज संध्याकाळी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मलकापूरचे शहीद संजय राजपूत यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद संजय सिंह राजपूत अमर रहे, वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. शहीद संजय राजपूत यांच्या जय आणि आकाश या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता. अंत्यसंस्कार संपल्यानंतर उपस्थितांनी पाकिस्तान विरोधातही घोषणाबाजी केली. सीआरपीएफचे जवान, सैन्याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती उपस्थित होते.
तसेच नितीन राठोड यांच्यावरही शोकाकुल वातावरणात मूळ गावी गोवर्धन नगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी श्रीमती वंदना शिवाजी राठोड वय 30 वर्ष, मुलगा चि. जीवन वय 10 वर्ष व मुलगी कु. जिविका वय 5 वर्ष, आई सौ.सावित्रीबाई वय 53 वर्ष, वडील शिवाजी रामू राठोड वय 58 वर्ष, दोन बहीण आणि एक भाऊ प्रविण राठोड वय 32 वर्ष असा परिवार आहे.
गोवर्धन नगर येथील आश्रम शाळेच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीवराव पाटील – निलंगेकर, विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ.शशिकांत खेडेकर, डॉ.संजय रायमूलकर, राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, जि.प. सभापती श्वेताताई महाले, सिं.राजा शहराचे नगराध्यक्ष नाझेर काझी, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे आदींनी शहीद जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व राज्य शासनाने जाहीर केलेल्या ५० लक्ष रूपये आर्थिक मदतीचा धनादेश कुटुंबियांना सुपूर्द केला. शहीद जवान यांना केंद्रीय राखीव पोलीस दल व पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आदरांजली दिली.