पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळूचे डंपर घेण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये हुंड्याच्या स्वरूपात घेऊन यावेत, या मागणीसाठी शारीरिक आणि मानसिक छळ करून अखेर विवाहितेस गळफास देऊन जीवे मारल्याची हृदयद्रावक घटना जंगीपुरा ता. जामनेर येथे बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
भाग्यश्री राहुल परदेशी (वय २८) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मयत भाग्यश्रीचे वडील सरदार बाबुलाल परदेशी (रा. पांगरा, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी पहाटे पती राहुल परदेशी, सासू रेखाबाई राजपूत, सासरे गोविंद राजपूत आणि दीर सुनील राजपूत यांनी संगनमताने भाग्यश्रीची हत्या केली आहे असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून पहूर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. पोलिसांनी नातेवाईकांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली. हुंड्यासाठी छळ करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल सासरच्या चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा (आत्महत्येस प्रवृत्त) नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पती राहुल राजपूत आणि सासू रेखा राजपूत यांना अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेत भाग्यश्री आणि राहुल यांचा तीन वर्षांचा चिमुकला यश याचे मातृछत्र हरपले आहे. हुंडाबळीने भाग्यश्रीचे भाग्य काळवंडले, अशा संतप्त भावना माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या. घटनेची माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम यांनी घटनास्थळी भेट दिली. पहूर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रमोद कठोरे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे करीत आहेत.



