जळगाव आरटीओमध्ये बनावट कर पावती प्रकरण उघड; एजंट आणि वाहन मालकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) बनावट व्यवसाय कर पावती सादर करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनधिकृत एजंट आणि वाहन मालकाविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरटीओ कार्यालयातील कर वसुली अधिकारी चंद्रशेखर शंकरराव इंगळे (वय ५६) यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. इंगळे यांच्या माहितीनुसार, ते परवाना विभागात कार्यरत असताना २३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान सुलतान बेग नजीर बेग मिर्झा (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हे शाकीब रहब शेख (रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांच्या मालकीचे वाहन क्रमांक (MH-१८-BA-०२२१) चा राष्ट्रीय परवाना रद्द करण्यासाठी अर्ज आणि कागदपत्रे घेऊन आले होते.

या कागदपत्रांमध्ये व्यवसाय कराच्या पावत्या जोडलेल्या होत्या. तपासणी दरम्यान, इंगळे यांना सन २०२३-२०२४ आणि २०२४-२०२५ या कालावधीतील दोन पावत्या बनावट असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यवसाय कर अधिकाऱ्यांकडे या पावत्यांची सत्यता पडताळणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला.

व्यवसाय कर कार्यालयाकडून २४ एप्रिल २०२५ रोजी प्राप्त झालेल्या लेखी माहितीनुसार, वाहन क्रमांक (MH-१८-BA-०२२१) चा सन २०२४-२०२५ या कालावधीचा व्यवसाय कर भरणा झालेला नाही (Not Found), असे स्पष्ट झाले. या बनावटगिरीमुळे शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत कर वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांनी अनधिकृत एजंट सुलतान बेग नजीर बेग मिर्झा आणि वाहन मालक शाकीब रहब शेख यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक करीत आहेत.

Protected Content