जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बनावट इन्स्टाग्राम व फेसबुकचे खाते तयार करून जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील २६ वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. या तरुणीचे अज्ञात व्यक्तींनी परस्पर इंस्टाग्राम तसेच फेसबुकवर बनावट खाते तयार केले. या बनावट खात्यांवर तरुणीचा फोटो तसेच नावाचा गैरवापर केला व या बनावट खात्यावरून तरुणीच्या ओळखीच्या व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून हे खाते खरे असल्याचे भासवून फसवणूक केली. एप्रिल महिन्यात घडलेल्या या प्रकाराविरुद्ध तरुणीने मंगळवार ३१ मे रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणीच्या तक्रारीवरुन बनावट खाते तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.