मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूकीच्या काळात मुंबईमध्ये बनावट नोटा प्रकरणी मोठी घटना उघडकीस आली आहे. मुंबई येथील वांद्रे-कुर्ला ४ मे रोजी बीकेसी परिसरातील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारखान्यात 5,10,100,500 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. याठिकाणी पोलिसांनी धाड टाकून बनावट नोटा आणि बनवण्यासाठी लागणारा कागदाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नौशाद शाह आणि अली सय्यद या दोघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बीकेसी पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
निवडणूक काळात पैशांच्या अवैध वाहतुकीवर निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेली भरारी पथकं लक्ष ठेवून आहे. निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. त्यासाठी मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई लगतच्या शहरांच्या वेशीवर नाकाबंदी करण्यात आली असून गाड्यांची तपासणी सुरु आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे. या काळात मतदारांना पैशांचे वाटप होत आहे का, याकडे निवडणूक आयोग आणि पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत.