फैजपूर, ता. यावल, निलेश पाटील | गॅस कटरच्या सहाय्याने येथील एटीएम मशीन तोडून यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न फसला असून आज सकाळी ही बाब उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, फैजपूर येथील दूध शीतकरण केंद्राच्या समोर स्टेट बँकेचे एटीएम आहे. आज पहाटे या एटीएममधून धूर निघत असल्याचे काही जणांना दिसून आली. यामुळे नागरिकांनी स्टेट बँकेतील कर्मचार्यांना फोन लाऊन याबाबतची माहिती दिली. कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून पोलीस स्थानक आणि अग्नमीशामन दलास पाचारण केले.
स्टेट बँकेच्या एटीएमला गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. मात्र चोरट्यांना मशिन कापता न आल्याने अर्धवट सोडून त्यांनी पळ काढल्याचे दिसून आले. ही घटना पहाटे झाल्याची माहिती समोर आली आहे. आज चौथा शनिवार आणि उद्या रविवार असल्याने बँकेतर्फे काल सायंकाळी एटीएममध्ये रोख रक्कम टाकण्यात आली होती. हीच रक्कम घेऊन पोबारा करण्याचा चोरट्यांचा मनसुबा होता. मात्र यात त्यांना अपयश आल्याचे दिसून आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा फैजपूर स्थानकाचे एपीआय सिध्देश्वर आखेगावकर आणि त्यांच्या सहकार्यांनी या संदर्भात चौकशी सुरू केली होती. तर अग्नमीशामन दलाने धगधगत असलेली आग काबूत आणली.