फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अंधारात एक दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, काल रात्री साडेसातच्या सुमारास वड्री येथील जे.डी.सी.सी बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक तथा फैजपूर श्रीराम कॉलनी येथील रहिवासी रमेश दगडू वारके( वय ६० वर्ष) हे काही कामा निमित्त यावल येथे गेले होते. बुधवारी सायंकाळी ७:३० ला ते यावल कडून फैजपूर ला जात होते. दरम्यान हंबर्डी-फैजपूर च्या रस्त्याच्या मध्यवर्ती भागात एक उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ला त्यांच्या दुचाकीने धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होत ते जागीच गतप्राण झाले.
या अपघाताची माहिती फैजपूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना कळताच त्यांनी घटना स्थळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,हवालदार देविदास सूरदास,महेंद्र महाजन, विनोद पाटील यांना पाठवले.व रमेश दगडू वारके यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला.
मयत रमेश वारके हे वड्री येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेवेला असल्याने वड्री गावात या संदर्भात माहिती मिळताच वड्री गावचे सरपंच अजय भालेराव,अतुल भालेराव सह अनेक नागरिकांनी यावल ग्रामीण रुग्णालय गाठले.यावेळी रात्रीच त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बरेला यांनी शवविच्छेदन केले.तर मयत रमेश वारके यांच्या पश्चात २ भाऊ, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.