फैजपूर नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावे : अमोल जावळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

फैजपूर-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावा, रावेर, यावल, फैजपूर शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भातील अडचणी लक्षात घेता तीनही नगरपालिकेंची आढावा बैठक घ्यावी आणि नवीन रेशन कार्ड व वाढीव कोटा या सह अनेक विषयांच्या संदर्भात रावेर यावल भाजप विधानसभा प्रमुख अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची भेट घेवून निवेदन दिले आणि सविस्तर चर्चा केली.

फैजपूर नगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असून पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने शहराचे पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. सद्यस्थितीत प्रशासनाच्या अभावामुळे शहरात गेल्या दोन महिन्यांपासून विविध भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही, सर्व ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पूर्णवेळ मुख्यधिकारी नसल्याचा परिणाम नगरपालिका प्रशासनावर सुध्दा झाला आहे. यामुळे पालिकेची कर वसुली, तसेच नागरिकांचे महत्वाचे कामे ही होत नसून याचा मनःस्ताप शहरातील नागरिकांना होत आहे. सर्व अडचणी बघता लवकरात लवकर पुर्ण वेळ मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सोबतच रावेर, यावल, फैजपूर शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भातील अडचणी लक्षात घेता तीनही नगरपालिकेंची आढावा बैठक घ्यावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली असता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी लवकरच तिन पैकी एका नगरपालिकेत भेट देवून आढावा बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले आहे. नवीन रेशन कार्ड साठी येणाऱ्या अडचणी आणि वाढीव कोटा या सह अनेक विषयांवर या वेळी चर्चा झाली.

Protected Content