फैजपूर नगरपालिकेतील ठेकेदारीतील भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन : शेख कुर्बान

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन आणि कुशल-अकुशल ठेकेदारी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. चौकशी न झाल्यास १ मे रोजी धरणे आणि २ मेपासून उपोषण आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे.

शेख कुर्बान यांनी फैजपूर पालिकेचे प्रशासक बबनराव काकडे आणि मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत वाहने दुरुस्ती, कर्मचारी ईपीएफ व ईएसआयसीच्या रकमा वसूल करण्यात आल्या नाहीत तसेच कचरा प्रक्रिया देखील झालेली नाही. त्यामुळे अशा अपूर्ण सेवांसाठी कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत कुशल व अकुशल कामगारांच्या ठेकेदारी व्यवहारांची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित अनामत रक्कम व बिले थांबवण्यात यावीत, अशी विनंतीही त्यांनी केली. याशिवाय, सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल व दुरुस्तीमध्ये देखील अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी जास्तीचे सीट दाखवून निधी उचलल्याचा प्रकार त्वरित थांबवावा व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दि. १७ एप्रिल रोजी पालिकेने दिलेल्या पत्रात चौकशी अहवाल सादर करण्यासाठी कोणतीही ठोस कालमर्यादा न दिल्याने शेख कुर्बान यांनी ३० एप्रिलपर्यंत लेखी खुलासा मिळाला नाही, तर १ मेपासून धरणे आणि २ मेपासून उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तथापि, प्रांत आणि प्रशासक बबनराव काकडे यांच्या विनंतीवरून त्यांनी तात्पुरते उपोषण मागे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content