…अखेर फैजपुर येथील मराठी शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम ( व्हिडीओ )

faizpur nagarpalika mohim

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या परिसरातील घाणीच्या साम्राज्याची माहिती चव्हाट्यावर आल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने आज या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. आता हीच तत्परता कायम राखण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, काल मराठी शाळेच्या पटांगणाची पाहणी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केली होती. याप्रसंगी त्यांच्यासोबत शालेय समिती सभापती शेख कुर्बान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, आरोग्य निरीक्षक विपुल साळुंके व मुख्याध्यापक आर.एल.आगळे होते. यात म्युनिसिपल हास्कुलच्या पाठीमागच्या मैदानात तेथील रहिवाशांनी घरातील सर्व कचरा त्या शाळेच्या मैदानात टाकलेला असल्याचे दिसून आले. यातच स्वच्छालयाचे पाईप व मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व गटारी तुडूंब भरल्या असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचे दिसून आले. या भागात नागरिकांनी पाईप सोडलेले दिसून आले. तर पोषण आहारदेखील याच अस्वच्छ वातावरणात तयार होत असल्याचे दिसून आले.

प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ही माहिती समोर आली. विशेष करून लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने याचा व्हिडीओ प्रसिध्द केल्यानंतर या प्रकरणाचे गांभिर्य प्रशासनाच्या लक्षात आले. आज जेसीबी आणि कर्मचार्‍यांच्या मदतीने या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. यामुळे या परिसरात आता बर्‍यापैकी स्वच्छता झालेली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेचे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कौतुक करत भविष्यातही याच प्रकारे स्वच्छता रहावी ही अपेक्षा व्यक्त केली. मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी या भागात स्वच्छता राहणार असल्याची ग्वाही दिली. या भागात अस्वच्छता करणार्‍या नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून या परिसरातील गटारींची कामे हे निधीच्या उपलब्धतेनुसार होतील अशी माहिती त्यांनी दिली. तर नगराध्यक्ष महानंदा होले यांनीदेखील या भागात आता नगरपालिकेतर्फे स्वच्छता राखण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच या भागात नंतर वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

दरम्यान, म्युनिसिपल हायस्कूलला लागून असलेल्या जिल्हा परिषद मराठी मुलांच्या ( शाळा क्रमांक एक ) शाळेच्या खोल्यांना गळती लागली असल्याने ताडपत्री लावून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत असल्याची माहिती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना दिली. याची दखल घेत, यावल गटशिक्षणाधिकारी शेख यांनी लागलीच जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन संबंधित मुख्याध्यापक यांना वर्गखोल्या दुरुस्तीचे तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिलेले आहे यावर संबंधित मुख्याध्यापक लवकरच दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवणार आहेत.

पहा : फैजपूर नगरपालिकेने घेतलेली दखल आणि मान्यवरांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ.

Protected Content