फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या पिंपरूड फाट्याजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पिता-पुत्र ठार झाल्याची दुर्घटना आज घडली.
फैजपूर येथून जवळच असलेल्या पिंपरुड फाट्यावरती अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार पिता पुत्र ठार झाल्याची घटना शनिवार सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घडली. अपघातात ठार झालेल्या पिता पुत्राचे नावे गोपाळ गेंदराज पाटील (६६) खेमचंद गोपाळ पाटील (वय३३ रा गुरुदत्त कॉलनी) अशी आहेत.
खेमचंद पाटील हा वडील गोपाळ पाटील यांना घेऊन (एम एच १९ डी.बी. ५४४२) या मोटर सायकलने चिखली खु ता यावल येथील शेतातून देवदर्शन करून फैजपूर कडे परतत असताना पिंपरुड फाट्यावरील सोनम एंटरप्राइजेस जवळ आमोद्याच्या दिशेने जाणार्या अज्ञात वाहनाने पाटील पिता पुत्रांच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात गोपाळ पाटील हे जागीच ठार झाले. तर खेमचंद पाटील याला जखमी अवस्थेत फैजपूर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असलेल्या पाटील याला पुढील उपचारासाठी जळगांव येथे घेऊन जात असतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ सपोनि प्रकाश वानखडे फौजदार रोहिदास ठोंबरे व त्यांचे सहकारी अपघात ग्रस्त ठिकाणी भेट देऊन चौकशी केली. या अपघाता प्रकरणी पोलिसात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मयत झालेल्या पाटील पिता पुत्रांचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले तर सायंकाळी दोघांवरती एकाच वेळी अंतसंस्कार करण्यात आले.यावेळी नातेवाईकानी एकच आक्रोश केला
दरम्यान, गतिरोधकाच्या अभावामुळे होत आहेत अपघात नुकताच आमोदा ते सावदा या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले चौपदरीकरण करीत असतांना पिंपरुड फाट्याजवळ असलेल्या चौफुलीवरती एकाही दिशेला गतिरोधक टाकण्यात आलेत नाही. त्यामुळे भरधाव येणार्या वाहांनी नेहमीच या ठिकाणी अपघात होत असतात. या रस्त्यावरती गतिरोधक टाकावे या करिता पिंपरुड तसेच विरोध ग्रामपंचायतीने संबधीत विभागाला पत्र दिले आहेत. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनीही संबधीतांना तसेच लोकप्रतिनिधी यांना अपघात टाळण्यासाठी गतिरोधक टाकण्याच्या सूचना केल्या होत्या,मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजच्या अपघातासारखी दुर्दैवी घटना घडल्याची खंत व्यक्त केली.