नागपुर प्रतिनिधी । राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरसंघचालकांशी चर्चा करण्यासाठी संघ मुख्यालयात दाखल झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस उलटले असले तरी महायुतीतील सत्ता स्थापनेचे सूत्र अद्याप ठरल्याचे दिसून येत नाही. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टिकेचे जोरदार प्रहार करण्यात येत असून मुख्यमंत्री हा आपल्याच पक्षाचा होणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाचे नेते अतिशय सावधपणे ही मजा पाहत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, आज रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातील संघ मुख्यालयात दाखल झाले आहेत. ते सत्ता स्थापनेबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेनंतर राज्यातील सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.