जळगाव प्रतिनिधी । विरोधी पक्षाचे काम हे सरकारला सूचना करण्याचेच असते…यामुळे फडणवीस यांनी फक्त सूचनाच कराव्यात असा टोला आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मारला. जिल्हा परिषदेत जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत दिव्यांगांसाठी शौचालय बांधकामाचे शुभारंभ करण्यात आला. यावेळी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, सीईओ डॉ.बी.एन.पाटील, अतिरिक्त सीईओ गणेश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.सदस्य अमित देशमुख, नानाभाऊ महाजन आदी उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांशी बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, सरकारवर टीका करणे सरकारला सूचना करणे हे त्यांचे कामच आहे, फडणवीस हे चांगले सुचनाकार असून त्यांनी कायम सरकारला सुचनाच कराव्या, अशी टीका ना. गुलाबराव पाटील यांनी केली.