औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एमआयएमने महाविकास आघाडीत सहभागी होण्याची दिलेली ऑफर ही फडणवीस यांच्या प्लॅन बी चा भाग असून त्यांना आघाडी फोडायची असल्याचा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारसोबत ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचाच हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा ‘बी प्लॅन’ आखला आहे, यामुळे शिवसेना आक्रमक होईल, महाविकास आघाडी तुटेल, असे त्यांचे मनसुबे आहेत. पण भाजपची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.
राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या बैठकीत सदर प्रस्तावाची चर्चा झाल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले. शिवसेना कधीही त्यांच्यासोबत जाणार नाहीत. संजय राऊत म्हणाले, त्याप्रमाणे जे औरंगजेबासमोर गुडघे टेकतात, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाहीत. ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांना आमच्याच औरंगाबादमधल्या सोनेरी महालात चार महिने डांबून ठेवलं होतं. आम्ही कसं सहन करणार? म्हणूनच शिवसेना प्रमुखांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. त्यामुळे ही यांची छुपी ऑफर आहे. आमचे जुने मित्र देवेंद्रजी फडणवीस यांची ही कल्पना आहे, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.
चंद्रकांत खैरे म्हणाले, भाजपने हे सरकार पाडण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र २०२४ पर्यंत काही होत नाही, असे त्यांना कळाले. आता त्यांनी २०२४ ची तयारी सुरु केली आहे. पण तोपर्यंत काय करायचे, म्हणून असा प्रकार सुरु केला. एमआयएमशी त्यांचं आतून टायअप झालं असेल. अशा वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक होईल आणि आघाडी तुटेल, असा डावपेच आखला आहे. देवेंद्र फडणवीसजी खूप बुद्धीवादी आहेत. आहेत. त्यांच्याच डोक्यातील ही कल्पना आहे. त्यांचा हा बी प्लॅन आहे, असं वक्तव्य खैरे यांनी केलं.