नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देवेंद्र फडणवीस यांनी ऐन वेळी उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारले ? याबाबत मोठा काथ्याकुट होत असतांना त्यांनी आज यामागील सिक्रेट सांगितले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नाट्यमय घटना घडल्या. एक तर शिवसेनेत उभी आणि ती देखील मोठी फूट पडणे अशक्य होते. यानच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री बनतील हे वाटत असतांना नेमके याच्या उलट झाले. यात पडद्यामागे काय घडले हे अद्याप गुलदस्त्यात होते. आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी याचे रहस्योदघाटन केले आहे.
नागपूर येथे भव्य स्वागत झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला नाही. आग्रह केला असता तर मुख्यमंत्री पद मिळालं असतं. आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता. मी म्हटल म्हणून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तर, आपण सरकारच्या बाहेर राहुन पक्ष संघटनेत काम करणार होतो. मात्र मला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आला. त्यांनी मला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगितलं. त्यानंतर अमित शहा यांचाही फोन आल्याचं फडणवीसांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मला अमित शाह यांचा फोन आला. त्यावेळी ते मला म्हणाले की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. तुम्ही सरकारच्या बाहेर राहून चालणार नाही. कॉंग्रेसच्या काळात मुख्यमंत्री असला तरी त्यावर बाहेरून नियंत्रण ठेवलं जायचं. अर्थात दोन शक्तीस्थळे असायची. यावरून आपण कॉंग्रेसवर टीका करत आलो आहोत. मग आपण तशा पद्धतीने काम करणे उचित होणार नाही. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्या, जेणेकरून दोन शक्तीस्थळे होणार नाही. यामुळेच आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचे फडणवीस म्हणाले.