Home आरोग्य नेत्रसेवेचा विक्रम : डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात १३१ तिरळेपणा शस्त्रक्रिया यशस्वी

नेत्रसेवेचा विक्रम : डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात १३१ तिरळेपणा शस्त्रक्रिया यशस्वी


 जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराने नेत्रसेवेच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली असून अवघ्या दोन दिवसांत तब्बल १३१ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.

पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान आणि डॉ. उल्हास पाटील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात आलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करून पात्र रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

या उपक्रमासाठी पुण्याचे प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली २० जणांची तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञांची टीम कार्यरत होती. या टीममध्ये नेत्ररोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ आणि नर्सिंग स्टाफचा समावेश होता. सर्वांनी समन्वयाने काम करत अत्यंत सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने शस्त्रक्रिया पूर्ण केल्या.

शिबिराच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १४३ रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६८ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आणि त्यांच्यावर १३१ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. तिरळेपणा हा डोळ्यांच्या स्नायूंशी संबंधित विकार असून त्यामध्ये दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशांना वळलेले दिसतात. यामुळे केवळ दृष्टीच नव्हे तर रुग्णांच्या आत्मविश्वासावरही परिणाम होतो. मात्र वेळेत उपचार केल्यास हा विकार पूर्णपणे सुधारता येतो, हे या शिबिरातून अधोरेखित झाले.

या शस्त्रक्रियांमध्ये नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. ललीत शाह, डॉ. राजेश पवार, डॉ. राजेंद्र लाहोरे, डॉ. रमेश भांगे, डॉ. अमोल वलझाडे, डॉ. नितीन भालेराव, डॉ. मनोज भायगुडे, डॉ. संजीव राठोड, डॉ. गौरव राठोड, डॉ. सचिन गडे, डॉ. गणेश बांदल, डॉ. सतीश देसाई, डॉ. उदय कुरूदकर, डॉ. वैभव वनारसे, डॉ. शामकांत कुळकर्णी, डॉ. अनिल वायकुले, डॉ. मयूर लांडे यांनी शस्त्रक्रिया केल्या. शिबीरासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील नेत्र विभागप्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. निखील चौधरी, डॉ. नितु पाटील, डॉ. रेणूका पाटील, डॉ. मयूरी निलावाड, डॉ. अभिजीत काकड, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. जतीन बाविस्कर, डॉ. शुभम भारसाके, डॉ. गौरव पाटील, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रीया गोरे, डॉ. वैष्णव व्यवहारे, डॉ. अश्विनी काकडे, डॉ. अनिश कडलगावकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन यांच्यासह इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आर्थिक अडचणींमुळे उपचार घेणे शक्य नसलेल्या अनेकांना या शिबिरामुळे नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत विविध वयोगटातील रुग्णांना या शिबिराचा मोठा लाभ झाला.

डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये तिरळेपणासारख्या विकारांकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे अशा मोफत शिबिरांची गरज अधिक आहे. तर डॉ. मधुसूदन झंवर यांनी तिरळेपणा हा पूर्णपणे उपचारयोग्य विकार असून वेळेत शस्त्रक्रिया केल्यास दृष्टी सुधारते, असे स्पष्ट केले. रुग्णालयाचे नेत्र विभागप्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर यांनी भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक रुग्णांना सेवा देण्याचा मानस व्यक्त केला.


Protected Content

Play sound