जळगाव प्रतिनिधी । अतिक्रमण काढणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस १ वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा व १ हजार रूपयांचा दंड जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे.
हकीकत अशी की, आरोपी होनाजी हेमराज चव्हाण (वय-३५) रा. बालाजी पेठ, सराफ बाजार हा भाजीपाला विक्रीचे काम करतो. २ नोव्हेबर २०१६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरातील बळीराम पेठ रोडवरील अतिक्रमण करून भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना उठविले व पुन्हा न बसण्याबाबतचा इशारा देण्यात आला.
यावेळी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी नसरूद्दीन अजीज भिस्ती (वय-28) हा जुना कापड गल्लीत रमेश किराणा दुकानासमोरील अतिक्रमण ११.२० वाजेच्या सुमारास काढण्याचे काम करत असतांना आरोपी होनाजी चव्हाण हा १५ ते २० भाजीपाला विक्रेत्यांना सोबत घेवून आला. व फिर्यादी नसरूद्दीन भिस्ती याची शर्टाची कॉलर पकडून चापटा, बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपी होनाजी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
जिल्हा न्यायालयात याबाबत दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर तपासधिकारी, अतिक्रमण विभागाचे अधिक्षक हाफिज उल्लाखान यांच्यासह सात जणांची साक्ष महत्वाची ठरली. याप्रकरणी आरोपी होनाजी या दोषी ठरवत कलम ३५३ अन्वये १ वर्ष सक्तमजूरी व ५०० रूपये दंड, ३३२ अन्वये दोषी ठरवून १ वर्ष सक्त मजूरी व ५०० रूपये दंडे अशी शिक्षा न्या. श्रीमती सी.व्ही.पाटील यांनी सुनावली आहे. या गुन्ह्यात आरोपीचे वय लक्षात घेता यापुर्वी कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा झालेली नसल्यामुळे न्यायालयाने प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर ॲक्ट नुसार कलमांतर्गत आरोपीस शिक्षेच्या कालावधीत त्याने कोणताही गुन्हा केल्यास त्याला दिलेली शिक्षा भोगावी लागेल म्हणजेच चांगल्या वर्तवणूकीचा बंधपत्र देवून मुक्त करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे ॲड.मोहन देशपांडे यांना कामकाज पाहिले.