मुंबई प्रतिनिधी । एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची हकालपट्टी करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली कार लावण्यासह या कारचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात काल रात्री उशीरा एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. प्रारंभी वाझे यांना हिरेने यांच्या मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आल्याचे मानले जात होते. मात्र यासोबतच अंबानी यांच्या निवासस्थाच्या बाहेर आढळून आलेल्या कारच्या प्रकरणात वाझे यांचा थेट सहभाग असून त्यांनीच हे वाहन लावल्याचा गंभीर आरोप एनआयएतर्फे करण्यात आला आहे. याच कारणामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.
दरम्यान, सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणी पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात सचिन वाझे यांची पाठराखण पोलीस आयुक्त व गृहमंत्र्यांनी केल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे. यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची हकालपट्टी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी या आशयाचे ट्विट केले आहे.
(Expel Home Minister and Commissioner of Police: Somaiya)