जळगाव प्रतिनिधी । उन्हाळी परीक्षेस बसलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे आई अथवा वडील किंवा दोघेही गमावलेत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने घेतला असून १५ जुलै पर्यंत महाविद्यालयांकडून संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
काही विद्यार्थी संघटनांनी या बाबतीत विद्यापीठाला निवेदन दिले होते. प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना परिपत्रक पाठविण्यात आले आहे. या परिपत्रकात महाविद्यालये / परिसंस्था /प्रशाळांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांचे आई अथवा वडील किंवा दोघेही कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्युमुखी पडले असतील त्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव घ्यावेत. ज्या बँक खात्यात परीक्षा शुल्क जमा करावयाचे आहे त्या बँकेचे नाव व खाते क्रमांक, आई/वडीलांचे मृत्यु प्रमाणपत्र, परीक्षा शुल्क भरल्याची पावती अशी माहिती १५ जुलै पर्यंत परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाकडे सादर करावयाची आहे असे या परिपत्रकात नमूद केले आहे.