जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमाळे गावात राहणाऱ्या एका तरुणाचा गावाजळील पाझर तलावाजवळ मंगळवारी २४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता मयतस्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरूणाचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. अनिल कमलाकर जाधव वय-३५, रा. उमाळे ता.जि. जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अनिल जाधव हा तरूण आपले आई-वडील यांच्यासह जळगाव तालुक्यातील उमाळे गावात वास्तव्याला होता. शेतमजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान सोमवारी २२ जुलै रोजी रात्री तो घरातून बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उमाळे गावापासून जवळ असलेल्या एका पाझरतलावाजवळ त्याचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील तरुणांनी घटनांसाठी धाव घेतली. त्यानंतर त्याला उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू तो अविवाहित असल्या कारणामुळे काही दिवसांपासून मानसिक तणावात होता अशी माहिती गावातील मित्रपरिवाराने दिली. मयत अनिल जाधव यांच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील कमलाकर जाधव, दोन भाऊ निलेश आणि संजय आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.