धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वाघुळदे येथील ४० वर्षीय तरूणाने वाघुळदे शिवारातील शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निवृत्ती अनिल पाटील (वय ४० रा. वाघुळदे ता.धरणगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील वाघुळदे गावात निवृत्ती पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. २७ सप्टेंबर रोजी सकाळी निवृती पाटील हे कामाच्या निमित्ताने दुचाकीने कामावर निघुन गेला. सायंकाळपर्यंत घरी आला नाही म्हणून त्यांची पत्नी रूपाली पाटील यांनी नातेवाईकांसह त्यांचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वाघुळदे शिवारातील लीलाबाई पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ निवृत्तीची दुचाकी मिळून आली. त्यावेळी गावातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. यात विहिरीत निवृत्तीची चप्पल पाण्यात तरंगतांना दिसून आली. काही तरूणांच्या मदतीने शोध घेतला असून निवृत्ती पाटील यांचा मृतदेह पाण्यात मिळून आला. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.