
चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव मतदारसंघाचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
राजीवदादा देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते चाळीसगावचे शिल्पकार म्हणून ख्यात असलेले लोकनेते कै. अनिलदादा देशमुख यांचे चिरंजीव होत. त्यांनी चाळीसगाव नगरपालिकेच्या माध्यमातून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. ते आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. यानंतर 2009 साली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेत निवडून गेले.
यानंतर त्यांना दोन वेळेस विधानसभेत पराभव पत्करावा लागला. गेल्या काही वर्षांपासून त्यांना प्रकृती अस्वास्थाचा त्रास होत होता. यातच ऐन दिवाळीच्या काळात हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले.
राजीवदादा देशमुख यांच्या निधनाने चाळीसगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील एक मान्यवर काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.



