नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘या देशाची घटना सेक्युलर शब्दावर आधारित आहे, हे मान्य केल्यानंतर चर्चेचा प्रश्न येतोच कुठे? खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच न्यायालयात राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेण्याची भूमिका मांडली होती. त्यामुळे त्याबद्दल शिवसेनेला कुणी शिकवू नये,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे.
देशाची घटना धर्मनिरपेक्ष संकल्पनेवरच आधारित आहे. त्यामुळे या शब्दाला विरोध करण्याचा किंवा आक्षेप घेण्याच प्रश्न उद्भवत नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. देशातील शेतकऱ्यांना मदत देताना त्यांचा धर्म पाहिला जात नाही. नोकऱ्या देताना उमेदवारांना त्यांचा धर्म विचारला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: तसा आदर्श घालून दिला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांनीही न्यायालयात धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्यास विरोध केला होता. राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेतली जावी, असं त्यांनी म्हटल्याची आठवण राऊत यांनी यावेळी दिली.