देवगिरी एक्सप्रेसवर सिनेस्टाईल सशस्त्र दरोडा

औरंगाबाद– अगदी एखाद्या चित्रपटाप्रमाणेच देवगिरी एक्सप्रेसवर रात्री उशीरा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून यात लुट करून दरोडेखोर फरार झाल्याने खळबळ उडालेली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने देवगिरी एक्सप्रेस निघाली होती. रात्री एकच्या सुमारास दरोडेखोरांनी पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सिग्नलला कापड बांधून एक्सप्रेस थांबविली. यानंतर लागलीच दरोडेखोरांनी एक्सप्रेसवर जोरदार दगडफेक सुद्धा केली. एक्सप्रेस थांबताच ५ नंबरच्या डब्यापासून ९ नंबरच्या डब्यापर्यंत दरोडेखोरांनी लूट केली. यावेळी दरोडेखोरांनी एक्सप्रेसमधील प्रवाशांचे सोन्याचे दागिने, पैसे, मोबाइल चोरी करून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आपला तपास सुरू केला आहे.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे संबंधीत दरोडेखोर हे रुग्णवाहिकेतून आले असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णवाहिका रेल्वे ट्रॅकजवळ उभी होती असं बोललं जात आहे. या घटनेनंतर एक्सप्रेस पुन्हा रवाना करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या दरोड्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून रेल्वे गाड्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांनी याबाबत तपासाची चक्रे फिरविण्यास प्रारंभ केला आहे. आज वरिष्ठ अधिकारी याबाबत घटनास्थळी भेट देण्याची शक्यता देखील आहे.

Protected Content