ब्रेकींग : ज्वेलर्स दुकानातून ११ लाखांचे सोन्याचे दागिने लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुकानाच्या शटरचे लॉक तर आतील चॅनलगेटचे कोयंडे कापून कारागिरांच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले १० लाख ७७ हजार ३०० रुपये किंमतीचे १८९ ग्रॅम सोने आणि सोन्याचे रॉ मटेरियल चोरले. ही घटना बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील जोशीपेठमधील संभव ज्वेलर्स या दुकानात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील आदर्श नगरात किशोर ओमप्रकाश वर्मा हे वास्तव्यास असून त्यांचे जोशीपेठ परिसरातील कालभैरव मंदिराजवळ संभव ज्वेलर्स नावाने सोन्याचे दुकान आहे. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर वर्मा यांचे ऑफिस आहे तर दुसऱ्या मजल्यावर सोन्याचे दागिने बनविण्याचे काम सुरु असते. त्यांच्याकडे आठ कारागिर असून ते गेल्या अनेक वर्षांपासून बंगाली कारागिर सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. त्यातील चार कारागिर हे गेल्या तीन ते चार महिन्यांपुर्वी गावी निघून गेले आहेत. किशोर वर्मा यांनी त्यांच्याकडे काम करणारा कारागिर मिलन चित्तरंजन पाकिरा याला दोन ते तीन दिवसांपुर्वी १०० ग्रॅम तर सुधार मदन सामंत याच्याकडे १०० ग्रॅम तर सुशांत राधानाथ मायती याच्याकडे ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दिले होते. मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी दिवसभर काम केल्यानंतर वर्मा हे रात्री साडेआठला तर त्यांचे कारागिर हे रात्री १० वाजता दुकान बंद करुन त्यांच्या रुमवर निघून गेले.

बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास किशोर वर्मा यांना त्यांच्यादुकानाजवळ राहणाऱ्या अनिल वर्मा यांनी तुमच्या दुकानात चोर घुसल्याची माहिती दिली. त्यानुसार वर्मा हे वडील व मोठ्या भावाला घेवून तात्काळ दुकानावर आले. यावेळी त्यांना दुकानाचे लहान शटरचे कान तर आतील चॅनल गेट कोयंडे तुटलेले दिसले. त्यांनी दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर जावून पाहणी केली. चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील ऑफिसचा दरवाजा तोडून त्याठिकाणी असलेल्या कारागिरांच्या ड्रॉवरचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेले १८९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रॉ मटेरियल असा एकूण १० लाख ७७ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content