देव जरी आला तरी आरक्षण घेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही : मनोज जरांगे पाटील

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |  प्रकाश आंबेडकर जरी आम्हाला वेगळं ताट घ्या म्हणत असले तरी आमच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडत आहेत. त्यामुळे तेच आरक्षण आम्ही घेणार आहोत. कुणबीमध्ये माझी जरी नोंद निघाली असली तरी, जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आरक्षणाचा लाभ घेणार नाही, असा मोठा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. ते मीडियाशी बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण घ्यावं. पण त्यांनी वेगळं ताट करावं, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. त्यावर ते बोलत होते. तसेच देव जरी आला तरी आम्हाला आरक्षण घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असंही ते म्हणाले.

कायदा आणि लोकशाही सर्वांसाठी एकच आहे. आम्हाला लोकशाह मध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे. याचिका जरी दाखल केली असली तरी न्यायमंदिर आमच्या बाजूने योग्य निर्णय देईल. कारण आमरण उपोषण केल्याने कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. पण आम्ही मुंबईला नक्की जाणार आणि आरक्षण घेऊन परत येणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. ओबीसींचाही 20 तारखेलाच आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा विचार आहे. त्यालाही (छगन भुजबळ) यांनाही आंदोलनासाठी घेऊन यावं, असा टोला लगावतानाच जर कायदा आमच्या बाजूने नसेल तर मग ही लोकशाही नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

तीन कोटी मराठा समाज हा आंदोलनासाठी मुंबईकडे जाणार आहे. मी जे आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाच्या मागे गोरगरीब मराठा समाज आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे? असा सवाल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना ते बोलत होते.

70 वर्ष आरक्षण असून दिले नाही आता हा आमचा राग आहे. जीवन जगताना जसे पाणी आवश्यक आहे, तसे आरक्षण आवश्यक आहे. नोंदी शोधतांना अधिकाऱ्यांवर दबाव येणार आहे, अशा अधिकाऱ्यांच्या मराठा समाजाने पाठीशी रहावे. आता देव जरी आला तरी मराठा समाजाला आरक्षण घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे मुंबईत या. या विजयी लढ्याचे साक्षीदार व्हा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं.

सरकारला आता आरक्षण द्यावेच लागणार आहे. तुम्हाला नेत्यांच्या मागे पळायचे तर पळा. राजकारण करायचे तर करा. पण आरक्षण मिळाल्यावरच. तोपर्यंत नाही, असं सांगतानाच मी मॅनेज होत नाही, हेच सरकारचे दुखणे आहे. माझा जीव जरी गेला तरी तुम्हाला आरक्षण घेऊन देणारच, असंही ते म्हणाले.

Protected Content