मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राज्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. अशातच विठठ्लाच्या नावाचा गजर करत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी वारकरी महामंडळाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत आता पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकार परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन लागू करणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या वतीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. महामंडळाचं भांडवल ५० कोटी इतकं असणार आहे. तसेच, कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे.
महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये वारकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केलं जाणार आहे. तसेच, वारकऱ्यांना पेन्शन लागू केलं जाणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाला देखील गती येईल. प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे, सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे, वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे हे महामंडळ निर्माण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून वारकरी महामंडळाच्या आदेशाची प्रत वारकऱ्यांना देण्यात आली आहे.