जामनेर शहराचा आज स्थापना दिवस : मुघल काळापासून अस्तित्व

Jamner Maharashtra 9932

जामनेर (प्रतिनिधी) ‘जामेहनुर’ या वरून जामनेर असं नाव पडल्याची मुघलकालीन पत्रव्यवहारात नोंद आढळते. जामाची मेर (मळा) म्हणून जामनेर तर काहींच्या मते कांगनेर (कांग नदी काठावरील महाल) यावरून जामनेर महाल म्हणजे आताच्या भाषेत महसुली केंद्र अर्थात मंडल वा सर्कल.

 

पूर्वी तर्फे, महाल, कसबा, पेठ, परगणा, खुर्द, बुद्रुक अशा वस्त्या होत्या. उदा. जामनेर तालुक्यातील वाकडी तर्फे यात हिवरखेडे त. वा., चिंचखेडे त. वा. ही गावे २) जामनेर महालात हिवरखेडे बु०॥, चिंचखेडे बु ०॥. ३) चिंचोली कसब्यात पिंप्री (कसबा), चिंचोली (कसबा)४) नाशिराबाद परगण्यात, कुऱ्हे (प्र.न.), गाडेगाव (प्र.न.)५) नदीच्या अल्याड व नदीच्या पल्याड एकाच नावाची दोन गावे असल्यास, त्यांच्या लोकसंख्येवरून जास्त लोकसंख्येच्या गावाला बुद्रुक तर कमी लोकसंख्येच्या गावाला खुर्द म्हणत असत. जसे ओझर बु०॥ व ओझर खु ०॥.६) कसबी कारागीरांच्या व शेतकऱ्यांच्या वस्तीला कसबा म्हणत, जसे- पहूर कसबे या गावात रंगारी, सुतार, सोनार, कुंभार, माळी या कारागीर व कास्तकारांची वस्ती अधिक. त्यांनी आपले कौशल्य पणाला लावून आकर्षक व सुंदर वस्तु बनवायच्या व जिथे बाजारपेठ अस्तित्वात असेल तिथे नेऊन विकायचे, यावरून पेठ अस्तित्वात आल्या. पेठ वसवण्याचे काम सरकारने नेमलेले वतनदार म्हणजे शेट्ये व महाजन करत असत म्हणून पहूर पेठ अस्तित्वात आले. ७) काही गावांना तिथल्या भौगोलिक वैशिष्टयांवरून नावे मिळाली.जसे-भरपूर पिंपळाची झाडे-पिंपळगाव, वडाची झाडे-वडगाव, बोरीची झाडे-बोरगाव या प्रकारात एकाच नावाची अनेक गावे आहेत. त्यांना ग्रामदैवतांवरुन किंवा त्या गावच्या कर्तबगार व्यक्तीच्या किंवा एखाद्या वैशिष्टयपूर्ण देवतांच्या नावावरून ओळखले जाऊ लागले. जसे-पळासखेड (मिराचे), पळासखेड (काकर), पळासखेड (मोगलाई) आता त्याला महानोरांचे म्हणतात, पिंपळगाव (हरेश्वर), पिंपळगाव (गोलाईत), पिंपळगाव (रेणूकाई)असा गावांचा एकंदरीत इतिहास आहे. कर्तबगार व्यक्ती किंवा कुळ यावरुन काही गावे ओळखली जातात.जसे मांडवे (धोब्याचे), मांडवे (कोळ्याचे), पळसखेड (सपकाळ).पळसखेड (गुजराचे) अशी काही गावे समाविष्ट होती, ती या नावाने ओळखले जात होती. जामनेरपुरा भागात पुरातन शिव मंदिर असून या मंदिराच्या गाभाऱ्यात भुयारी मार्ग असल्याचे सांगण्यात येते. या शिव मंदिराच्या नदी पलीकडे जुना जहागीरदार वाडा आहे. जो पुरातन काळापासून आहे. इंग्रज काळातील रेल्वे लाइन आहे. शिर्डीचे साई बाबांनी सुध्दा येथे मुक्काम केला असल्याचे दाखले दिले जातात.

Add Comment

Protected Content