एरंडोल (प्रतिनिधी ) शहरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयाच्या आवरात कर्माचाऱ्या साठी असलेल्या स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून स्वच्छता गृह परिसरात पसरत असलेल्या दुर्गंधीमुळे कर्माचा-यांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता गृहांच्या दुर्दशा झाल्याने महिला कर्माचाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्थानक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, बसस्थानक, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग ,कृषी कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालय आहेत. याठिकाणी कर्माचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छता गृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तसेच अनेक कार्यालयांमध्ये स्वच्छता गृहांची सोय नसल्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात असलेल्या स्वच्छता गृहाचे अस्तित्वच संपुष्टात आले असुन या ठिकाणच्या टाईल तसेच असलेले बेसिनचे भांडे फुटले असुन याठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पंचायत समितीचे प्रवेशद्वार खराब असल्यामुळे रात्री कार्यालय परिसर उघडे राहत असल्यामुळे मद्यप्राशन करण्यासाठी योग्य जागा म्हणुन या ठिकाणाकडे पाहिले जाते. रात्री मद्यपान केल्यानंतर खाली बाटल्या तसेच अन्य साहित्य स्वच्छता गृहातच टाकल्या जात असल्यामुळे याठिकाणी बाटल्यांचा खच पडलेला असतो. स्वच्छता गृहाच्या भिंतींवर गुटखा खाऊन थुंकल्यामुळे सर्व भिंती रंगीबेरंगी झालेल्या आहेत. बस स्थानकावर असलेल्या स्वच्छता गृहांचे दरवाजे तुटले असुन सर्व सांडपाणी परिसरातच जमा होत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यासह सर्वच शासकीय कार्यालय परिसरात असलेल्या स्वच्छता गृहांची नियमित साफ सफाई होत नसल्यामुळे कर्मचा-यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवित असतांना आपल्याच शासकीय कार्यालतील स्वच्छतागृह केव्हा स्वच्छ केले जातील याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.