एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मेन रोडवर असलेले सोन्या-चांदीचे दागिने तयार करण्याचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख किमतीचा मुद्देमाल पळवल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक ११ मार्च रोजी पहाटे दोन ते सव्वातीन वाजेच्या दरम्यान शहरातील प्रसाद वाघ यांच्या मालकीचे माऊली ज्वेलर्स नामक सोन्या चांदीचे दागिने तयार करण्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. या दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप न उघडता शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
यानंतर चोरट्यांनी दुकानातील ऑर्डर साठी आलेले ५० हजार रु.किमतीचे १० ग्रॅम सोन्याचे दागिने,४५हजार रु.किमतीचे सोन्याची पॉलिश केलेले दागिने,१ लाख १० रु. हजार किमतीचे सोन्याची पॉलिश केलेल्या फुल्या,५० हजार रु.किमतीचे चांदीचे भांडे,कडे व मोड असा एकुण २ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
दरम्यान दुकानासमोरील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात व गावातील सी.सी. टी.व्ही.कॅमेर्यात तोंडाला रुमाल बांधलेले चार चोरटे दिसत असल्याचे तसेच चोरटे इको कंपनीच्या चारचाकी गाडीत दुकानासमोर आले व त्यांनी दुकानाला गाडी आडवी लावली असल्याचे देखील सी.सी. टी. व्ही.कॅमेर्यात दिसत आहे.
दुकानदार प्रसाद वाघ हे आपल्या परिवारासोबत एरंडोल येथे नागोबा मढी येथे राहतात. गेल्या तीन दिवसापासून ते नातेवाईकाच्या लग्नाला नाशिक येथे गेले होते ते दि.१० मार्च रोजी रात्रीच परत आले ११मार्च रोजी सकाळी सहा वाजता दुकाना शेजारी राहणारे सायकल मार्टचे मालक भगवान चौधरी यांनी फोन करून सदरील माहिती दिली असता ते तात्काळ दुकानावर हजर झाले. त्यांनी लागलीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ येऊन पंचनामा करीत चौकशी केली.
याप्रसंगी श्वान पथक शहरात दाखल झाले होते त्याने बुधवार दरवाजा पर्यंत माग दाखवला.पुढील तपास एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल,अनिल पाटील,मिलिंद कुमावत,पंकज पाटील करत आहे. शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या चोरी बद्दल एरंडोल शहरवासीयांच्या व व्यापार्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एरंडोल पोलिसांसमोर सदर चोरट्यांना पकडण्यासाठी मोठे आव्हान ठाकले आहे. तरी या चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी होत आहे.