एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल ते म्हसावद या २२ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एरंडोल ते म्हसावद हा राज्यमार्ग असून त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ठेकेदार रुंदीकरण केलेल्या जागेवर केवळ मुरूम पसरवून रोलरने दाबण्याचे काम करत आहे. या ठिकाणी मुरूमावर पाणीही टाकले जात नसून केवळ मुरूम टाकून तो रोलरच्या सहाय्याने दाबण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वॉटरिंग न केल्यामुळे अवघ्या काही दिवसातच मुरूम उखडून रस्त्याची दुर्दशा होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या कामास काही नागरिकांनी विरोध केल्यानंतर मध्यंतरी काही दिवस हे काम बंद होते, मात्र आता पुन्हा या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून ठेकेदाराची कानउघाडणी करावी, अशी मागणी केली जात आहे.